लक्षात घ्या …व्यसनाधीनता हा एक मानसिक आजार आहे!
आणि त्यावर उपचार आहेत.
व्यसन सोडताना जो त्रास व्यसनी व्यक्तीला होतो त्याला”withdrawal symptoms” म्हणतात, उपचारांनी ते कमी करता येतात आणि व्यसन सोडणं सोपं जातं, शक्य होतं.
याची खात्री पटली की काही लोकं औषधांची,डॉक्टरांची मदत घ्यायला तयार होतात. अशा लोकांना औषधोपचार आणि समुपदेशन या दोन्हींच्या मदतीने चांगले उपचार करणं शक्य होतं.
ज्या व्यसनी व्यक्ती डॉक्टरांकडे येण्यासाठी तयार नसतात त्यांच्यासाठी देखील वेगळे पर्याय सुचवले जातात.
व्यवस्थित उपचारांनंतर काही लोक पूर्णपणे व्यसनमुक्त राहू शकतात तर काही लोक पुन्हा वेगवेगळ्या कारणांमुळे पुन्हा पुन्हा व्यसनांकडे वळण्याची शक्यता असते. कारण फक्त मनाचा निश्चय करून व्यसनमुक्त होणं सगळ्यांना जमतं असं नाही.
*नवजीवन व्यसनमुक्ती तथा पुनर्वसन केंद्र*
हे एक असं ठिकाण ज्याची आज आपल्या समाजाला आत्यंतिक गरज आहे.
एखादी व्यक्ती शरीराने, मनाने आजारी पडली तर तिला कोणीही समजून घेऊ शकते आणि अशा व्यक्तीवर उपचार करायला, मदत करायला स्वतःहून लोकं पुढे येतात.
पण व्यसनाच्या आहारी गेलेल्या आणि स्वतःचे आयुष्य दिवसेंदिवस खराब करून घेणाऱ्या लोकांबद्दल मात्र घरी-दारी कोणालाही सहानुभूती वाटत नाही. समाजाकडून त्यांची उपेक्षाच केली जाते..त्यांना आणि त्यांच्या घरातल्या इतर लोकांना समाज नावे ठेवतो.
व्यसनमुक्ती केंद्र हे अशा लोकांना आपलेपणाने सांभाळणारे,उपचार करणारे आणि आयुष्याची नवी दिशा दाखवणारे असे ठिकाण आहे जिथे काही दिवस राहिल्यानंतर व्यसनी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडून यावा यादिशेने प्रयत्न केले जातात.
व्यसनी व्यक्तीविषयी आस्था, प्रेम मनापासून वाटणारे कोणीतरी जवळचे नातेवाईक व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत घेऊन येतात.
कधी कधी काही व्यक्तींना आपण स्वतःच करत असलेल्या व्यसनाचा खूप त्रास होत असतो. अशा व्यक्ती स्वतःहून व्यसन बंद करण्याचा प्रयत्न करून बघतात पण त्यांना त्याचा खूप त्रास होतो आणि त्या त्रासाला घाबरून त्यांची व्यसन सोडण्याची इच्छा असली तरी पुन्हा व्यसन केला जाते.
अशा व्यक्ती स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत येतात.
मनात व्यसन सोडण्याचा निश्चय करून आलेल्या व्यक्ती केंद्रात राहून पुन्हा निरोगी आणि निर्व्यसनी आयुष्याकडे परत जाण्याचे प्रमाण चांगले आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात नेमके काय असते? कसे उपचार केले जातात याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता असते.
*व्यसनमुक्ती केंद्रच का?*
कारण येथे व्यसनी व्यक्तीला ठराविक कालावधी साठी निवासी राहता येईल अशी केंद्रात सोय असते.
येथे राहिल्यामुळे व्यसनी व्यक्तीच्या दिनक्रमात बदल घडून येणे शक्य होते, व्यसनामुळे जडलेल्या आजारांवर आणि व्यसन सोडताना होणाऱ्या त्रासावर उपचार करणे शक्य होते.
व्यसन करत असतांनाच्या कालावधीत आपलं रोजचं रुटीन बिघडून गेलेले लोकं पुन्हा आपलं रुटीन व्यवस्थित सुरु करू शकतील असे विविध पर्याय त्यांना दिले जातात.
आपल्या सारख्याच इतर लोकांशी जुळवून घेऊन राहण्याची आणि त्यांच्याशी मैत्री, संवाद करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे मनातील लाज आणि वाटणारा कमीपणा यावर मात करून व्यक्ती सहजपणे समाजाकडे परतू शकते
अनेक वर्ष व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे शरीराला व्यसनाची सवय असते आणि व्यसन बंद केल्यावर शरीर आणि मन देखील अस्वस्थ, अस्थीर होऊ शकते. असे परिणाम दूर करण्यासाठी औषधे आणि समुपदेशन या गोष्टींची मदत होते.
व्यसनापासून दूर राहताना पुन्हा व्यसन करण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होऊ शकते पण केंद्रातील बंदिस्त आणि सुरक्षित वातावरणात या इच्छेवर मात करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
आयुष्य सुंदर आहे फक्त आयुष्याकडे आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींकडे कसे बघावे याचे मार्गदर्शन केंद्रात वेळोवेळी आणि विविध उपक्रमांमधून केले जाते.
दृष्टीकोन बदलला की आयुष्य सावरायला मदत होऊ शकते.
*कसा असतो व्यसनमुक्ती केंद्रातला दिवस?*
अत्यंत नियमित आणि शिस्तबद्धपणे दिवसाची सुरुवात होते.
सकाळची व्यक्तिगत स्वच्छता आटोपल्यानंतर प्रार्थना, समुपदेशकांकडून प्रत्येकाची व्यक्तिगत चौकशी आणि जाणवणाऱ्या अडचणींची दखल अशी दिवसाची सुरुवात होते.
माझ्या आयुष्यातील जी परिस्थिती मी बदलू शकतो आणि जी परिस्थिती मी बदलू शकत नाही यातील फरक समजण्याची, स्वीकारण्याची शक्ती माझ्यात येऊ दे..ही एक सकारात्मक प्रार्थना इथल्या प्रत्येकाच्या जगण्याचा भाग आहे.
व्यसनाचे शरीरावर आणि मनावर झालेले परिणाम ओळखून त्यावर उपाययोजना केली जाते.
शारीरिक व्यायाम,योगसाधना,ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिकवले जाते.
आहार, करमणूक आणि स्वस्थ झोप याकडे देखील खास लक्ष दिले जाते.
काही दिवसातच व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये अमुलाग्र सकारात्मक बदल घडून आणण्याच्या दिशेने संपूर्ण प्रयत्न केले जातात.
चुकून वाट चुकलेल्या लोकांचं जगणं सोपं होण्यासाठी मदत करणं हे जगण्याच्या नेहमीच्या चाकोरीला छेद देणारं काम आहे आणि ते सोपे नक्की नाही.
या कामात देखील आव्हाने आहेत,अडचणी आहेत. रस्ता सोपा नाही.
पण हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे.
त्यासाठी विचारसरणीमध्ये आणि जीवनशैली मध्ये बरेच बदल करावे लागतात. हे बदल घडायला वेळ लागतो आणि तोपर्यंत व्यसनमुक्त राहण्यासाठी अशा व्यक्तीला काही दिवस व्यसनमुक्ती केंद्रात केलेल्या उपचारांनी फायदा होऊ शकतो.
केंद्रात दाखल झाल्यामुळे व्यसन आणि व्यसन करणाऱ्या मित्रांपासून दूर झाल्यामुळे ही व्यक्ती सुरक्षित ठिकाणी असते. पहिल्या आठवड्यात केलेल्या उपचारांनी शरीरातून व्यसनाचा उतारा होतो आणि व्यसन सोडतांना होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त होतो. मग परत व्यसनाकडे वळू नये म्हणून विचारसरणी आणि जीवनशैली मध्ये काय बदल करायला हवेत आणि कसे करायला हवेत ह्या जीवन उपयोगी विषयांवर मार्गदर्शन केले जाते. केंद्रात राहिल्यामुळे परत एकदा शिस्त जीवनात येते.
झोपण्याच्या, उठण्याच्या सवयी नियमित होतात. रोज सकाळी योगासनं, प्राणायाम,ध्यान करून घेतल्यामुळे शारीरिक वा मानसिक आरोग्य सुधारतं.
केंद्रात पेशंटचे गट करून त्यांना कामाच्या जबाबदाऱ्या दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ही वाढतो आणि त्यांना आपण काही योगदान कामात दिले तर त्याचं समाधान काय असतं हे पण कळतं.
व्यायाम करा म्हटलं तर पेशंट करत नाही पण केंद्रात व्यायाम करून घेतल्यामुळे काही दिवसातच स्वानुभवातून फायदा समजल्यामुळे पेशंट प्रेरित होतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यात काय सुख आहे ते त्यांना कळतं. केंद्रात 12 पायऱ्यांवर आधारित समुपदेशन कार्यक्रम राबवला जातो.
आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या जीवनावर मद्यपानामुळे काय काय परिणाम झाले आहेत याची जाणीव त्यांना होऊ लागते.
आपल्या स्वभाव दोषांचा निर्भय आढावा घेऊन ते दूर करण्यासाठी केंद्रात काम सुरु होतं. जीवनातला ताण तणाव कसा हाताळायचा, विचार आणि भावनांचं नियमन कसं करायचं हे चर्चेतून शिकायला मिळतं. रिकामा वेळ कसा सदुपयोगी लावायचा यासाठी छंद आनंद कार्यशाळा ही केंद्रात होते.
व्यसनामुळे किंवा व्यसनापूर्वी असलेले उदासीनता,घबराहट,संशयाचे मानसिक आजार वा स्वभावदोषांवर औषधोपचार ही केंद्रात होतात.
दर रविवारी केंद्रात जुने नवीन रूग्णांची मिटिंग घेण्यात येत. दर महिन्याच्या गुरुवारी नातेवाईकांसाठी समुपदेशन सत्र असते.
घरी गेल्यानंतर नियमित तपासणीसाठी येणं हे खूप महत्वाचं असतं याची पेशंट ला कल्पना दिली जाते.
शहरी आणि ग्रामीण रुग्णांच्या गरजा, तणावाचे विषय,समस्या वेगवेगळ्या आहेत हे ओळखून आम्ही यवतमाळ मध्ये निवासी व्यसनमुक्ती तथा पुनर्वसन केंद्र सुरु केलं आहे.
बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की व्यसन हा देखील एक आजाराच आहे आणि त्यावर विशिष्ट उपचार आहेत. एक व्यक्ती व्यसनमुक्त झाली की त्याचं बघून अनेकजण सल्ला घेतात,
या केंद्राला एकदा भेट दिली तर समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आपणही आपल्या जवळच्या कोणाला व्यसनमुक्त आयुष्य घालवण्यासाठी मदत करू शकता.
व्यसनात अडकलेले लोक, त्यांचे नातेवाईक नेहमी एक प्रश्न विचारतात..
व्यसन सुटेल याची गॅरेंटी आहे का?
व्यसनमुक्ती केंद्रात केल्या जाणाऱ्या उपचारांची आणि प्रयत्नांची गॅरेंटी 100 टक्के.
तुम्हाला व्यसनापासून सोडवण्यासाठी आम्ही 100 काय 1000 टक्के प्रयत्न करणार..
आणि त्याला तुमचंही सहकार्य असेल तर आपण मिळून केलेला तुम्ही व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न यशस्वी होणारच.
व्यसनाच्या विळख्यात अडकलेली माणसे ही माणसेच असतात.. वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तींची.
व्यसनाचा प्रभाव नसेल त्यावेळी ती त्यांच्या नेहमीच्या स्वभावा नुसार वागतात.
असे असले तरी व्यसनाचा प्रभाव त्यांना वाईट वागण्यासाठी प्रवृत्त करतो.
त्यांच्यात अवगुण शिरतात आणि पूर्वी सन्मार्गी, सरळ असलेला माणूस बघता बघता वाईट वागायला लागतो. काहींच्या मूळ प्रवृत्तीच इतरांना त्रासदायक असतात..अशा लोकांमध्ये अवगुण शिरले की ते गुन्हेगारीच्या मार्गावर जाऊन पूर्णपणे भरकटतात.
काही जण व्यसनाची गरज भागवण्यासाठी गुन्हेगार होतात.
व्यसनाच्या अंमलाखाली माणसे कशीही वागू शकतात पण हीच माणसे व्यसनाचा प्रभाव कमी झाला की पुन्हा चांगली होतात. घराच्या लोकांना शिवीगाळ, मारहाण असे प्रकार तर होतातच पण चोऱ्या करणे, खोटं बोलणे या सारख्या सवयी सुद्धा लागतात.
ही वाट चुकलेली माणसे आहेत. त्यांना वाट दाखवून दिलेली त्यांना समजली की पुन्हा कदाचित त्यांचा प्रवास सुरळीतपणे सुरु होऊ शकतो.
कोणताही माणूस वाईट नसतो तर कधी कधी त्याच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती, त्यात त्याने घेतलेले काही चुकीचे निर्णय, त्याला मिळालेली अयोग्य संगत वाईट असते आणि जर त्या परिस्थितीने एखाद्याच्या आयुष्यावर जर परिणाम करून आयुष्याचा, नातेसंबंधांचा काही भाग खराब केला असेल तर तो काही संपूर्ण आयुष्याचा शेवट नसतो तर एक तात्पुरती अवस्था असते.
सगळं आयुष्य संपलेले नसतं..काही नाती अजूनही सोबत असतात.त्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल आशा असते. स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी पुन्हा निरोगी आणि व्यसनमुक्त आयुष्याकडे परत जातं येणे शक्य आहे यासाठी वेगळं काही करावे लागत नाही तर लागते केवळ इच्छाशक्ती आणि धाडसाने केलेले प्रयत्न.
असे प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात मिळते.
जीवन खूप सुंदर आहे! आपल्या आजूबाजूचा निसर्ग..लहान मुलं, आपल्या कुटुंबातून आपल्यावर अवलंबून असलेले सदस्य यांच्यासहित असलेलं आपलं आयुष्य खूप सुंदर आहे! आनंदाने भरलेले असे कितीतरी छोटे छोटे क्षण त्यात आहेत, अनेक छोट्या प्रसंगातून आपण आनंद मिळवू शकतो.
आयुष्याच्या कुठल्याशा टप्प्यावर जखमी होऊन किंवा स्वत:ला जखमी करून घेऊन वाट चुकलेली ही माणसे शुद्धी बेशुद्धीच्या सीमारेषेवर इथे येतात ती लडखडत्या पावलांनी..हरवलेल्या नजरेने आणि संपूर्णपणे मोडून पडलेल्या मनस्थितीत,तेव्हा काही वेळा ते त्याच्या घरातल्यांनाही ती नकोसे झालेले असतात आणि त्यांना स्वत:लाही स्वत:ची जाणीव नकोशी झालेली असते.
अशा सगळ्यांना सामावून घेणं आणि वाट चुकलेल्या रस्त्यावरून परत पुन्हा माणसात आणणं हे सोपं नाही तसं अशक्यही नाही हे व्यसनमुक्ती केंद्रात घडून येतं.