व्यसन म्हणजे नेमके काय? एखादी गोष्ट प्रथम केल्यावर काही आनंद वाटतो किंवा विलक्षण अनुभव येतो. मनाला खूप छान वाटते. पण त्यानंतर ती गोष्ट पुनःपुन्हा वारंवार करावीशी वाटू लागते. आणि परत परत ती गोष्ट करताना जरी आनंद मिळाला नाही तरी ती केली जाते. काहीही घडले तरी ती गोष्ट करावीशी वाटत राहते.. ती गोष्ट केली नाही तर मन बेचैन होते आणि शरीर अस्वस्थ होते. ती गोष्ट म्हणजे आयुष्याचा एक अनिष्ट भाग होऊन बसते. तिची एक यांत्रिक सवय होऊन जाते. यालाच व्यसन म्हणतात.
पुढे पुढे व्यसन करण्यासाठी इष्ट-अनिष्ट, योग्य-अयोग्य, अनैतिक, पाप, चोरी, मानवतेला काळिमा फासणाऱ्या गोष्टी… काय वाटेल ते करण्याची मनाची तयारी होते. ती व्यक्ती त्या सवयीच्या पूर्ण आहारी जाते, त्या सवयीचा एकनिष्ठ गुलाम बनते.
प्रचलित वैद्यकीय विचारानुसार व्यसन हा एक मेंदूच्या कार्यासंबंधीचा आणि व्यक्तीच्या वर्तनाविषयीचा एक महत्त्वाचा आजार मानला जातो. मद्य, तंबाखू, अफूजन्य पदार्थ, कोकेन, श्वासावाटे ओढली जाणारी वायुरूप रसायने असे काही अमली पदार्थ तर यात समाविष्ट असतातच. पण जुगार, गेमिंगसारख्या सवयी आणि मोबाईल, संगणक अशा आधुनिक उपकरणांचीदेखील व्यसने लागतात असे मानले जाते.
व्यसनाधीनतेची कारणे
वैद्यकीय कारण : आपल्या मेंदूमध्ये संवेदना जाणून घेणारी काही विशिष्ट केंद्रे असतात. यामध्ये आपल्याला आनंद देणारी घटना जाणून घेणारे, एखादा आनंद मिळाला म्हणजे आपल्याला बक्षीस मिळाल्यासारखी परिपूर्णतेची भावना निर्माण करणारे केंद्र असते. एखाद्या गोष्टीपासून आपल्याला आनंद होतो ही भावना डोपामिन नावाच्या मेंदूतील एका विशेष रासायनिक संदेश वाहकाद्वारे मेंदूतील या केंद्रांकडे पोचवली जात असते. हे अमली पदार्थ, जुगार, गेमिंगसारख्या सवयी किंवा उपकरणांचा वापर करताना मेंदूमधील हे डोपामिन जोमाने कार्यरत होते आणि आनंदाच्या लहरी मेंदूकडे पोचवल्या जातात. जेंव्हा ही गोष्ट वारंवार होते, तेंव्हा मेंदूच्या त्या केंद्रामध्ये त्या गोष्टीचे आणि आनंदप्राप्तीचे एक घट्ट समीकरण तयार होते, आणि अशा आनंद लहरींची अपेक्षा मेंदूच्या केंद्रात वारंवार व्हायला लागून ती व्यक्ती ती गोष्ट सातत्याने करू लागते आणि ’व्यसन’ निर्माण होते.
जनुकीय करणे आणि आनुवंशिकता : काही व्यसने लागण्यामागे जनुकीय कारणे असतात. ठराविक जनुकांमुळे काही व्यक्तींमध्ये ठराविक व्यसनांचे आकर्षण निर्माण होऊन त्या व्यक्ती त्या विशिष्ट व्यसनाच्या आहारी जातात, असे संशोधनात आढळून आले आहे. स्त्री-पुरुष असा लिंगभेदही व्यसनी व्यक्तींच्या शिरगणतीत आढळून येत नाही. व्यसनाने ग्रस्त होणाऱ्या व्यक्तीत माणसांचे सर्व वर्ण तितकेच मोठ्या प्रमाणात आढळतात.
सामाजिक कारणे
व्यसनाधीनतेमागे अनेक सामाजिक कारणांचा अंतर्भाव होतो.
भावनिक असुरक्षितता व प्रेमाचा अभाव : कोणतीही व्यक्ती व्यसनाधीन होण्यासाठी मद्यसेवन करत नाही. काल्पनिक अथवा खऱ्याखुऱ्या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी मद्य, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांचा वापर केला जातो. पालक वात्सल्य आणि प्रेम देण्यात असमर्थ ठरले, पालकांमध्ये मतभेद असले, पालक हुकूमशाही प्रवृत्तीचे असले तर बालवयातच मुलांच्या मनावर ओरखडे उमटतात आणि व्यसनाकडे वळण्याची शक्यता असते.
पैशांचा गैरवापर व मार्गदर्शनाचा अभाव : सहज उपलब्ध होणारा पैसा व्यसनाकडे घेऊन जाण्याची शक्यता असते. आजच्या बदलत्या वातावरणात चंगळवादाला बळी पडलेल्या पालकांचे अंधानुकरण करणारी मुले नकळत व्यसनाला बळी पडत आहेत.
*उत्सुकता* : व्यसने करणाऱ्या पालकांना पाहून, चित्रपटातील नटांचे अनुकरण म्हणून, समाजातील आजूबाजूच्या व्यक्तींचा प्रभाव यामुळे मुलांनाही धूम्रपान किंवा मद्यसेवनाचे आकर्षण वाटू लागते. या टप्प्यावर मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले भरकटतात. त्यांना विविध व्यसनांची चव घ्यावीशी वाटते. हीच उत्सुकता मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवते.
*संगत* : शाळा, महाविद्यालये आणि निरनिराळ्या व्यवसायात व्यसनाला बळी पडलेले तरुण असतात. अशा व्यक्तींच्या संपर्कात वारंवार आल्याने एखादी निर्व्यसनी युवकदेखील व्यसनाकडे ओढला जातो आणि कालांतराने व्यसनाधीन होतो.
कमकुवत मन : ज्या व्यक्तींना तणाव सहन करायची कुवत कमी असते, असे लोक व्यसनाच्या लवकर आहारी जातात.
व्यसनाधीनतेचे टप्पे
सर्वसामान्य निर्व्यसनी व्यक्ती व्यसनाधीन होण्याचे चार टप्पे असतात.
व्यसनाची तोंडओळख अथवा *सुरवात* : व्यसनांची सुरवात गमतीत होते. कधी मित्रमंडळीत गंमत म्हणून, कधी कुतूहल तर कधी धाडस म्हणून या पदार्थांचा संबंध येतो. ही झाली तोंडओळख.
*सहज सेवन* : व्यक्ती स्वत:हून कधीकधी ’सहज’ हे पदार्थ वापरून बघते.
*सतत सेवन* : या टप्प्यात ती व्यक्ती त्या पदार्थाच्या पूर्ण आहारी जाते. तो पदार्थ जर मिळाला नाही तर त्रासदायक शारीरिक, मानसिक लक्षणे दिसतात. उदा. सतत दारू पिणाऱ्याला एखादा दिवस दारू मिळाली नाही तर अंगाची थरथर, उन्मादी अवस्था होते. या पायरीवर व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेतही कायमचे बदल होत जातात. उदा. पैशासाठी खोटे बोलणे, चोरी, आक्रमकता, असहायता, इत्यादी गोष्टी स्वाभाविक होऊन जातात.
*व्यसनपतित* : या अवस्थेत व्यसनाधीन व्यक्तीच्या स्वभावात कायमचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. उदा. दारू पिणाऱ्यामध्ये यकृताला सूज येणे, हातापायांना मुंग्या येणे, मेंदूत कायमचे दोष तयार होणे, स्वभावात अनेक दोष कायमचे पक्के होतात, या अवस्थेत कितीही मदत केली तरी ती व्यक्ती सुधारण्याची फारशी शक्यता नसते. अशी व्यक्ती समाजातून बाहेर फेकली जाते.
*व्यसनमुक्ती*
व्यसनमुक्तीसाठी होणाऱ्या उपचारात केवळ व्यसन सोडायचे उपचार करून भागत नाही, तर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणे, त्याच्या कुटुंबासाठी त्याची उपयुक्तता निर्माण करणे, त्याला चरितार्थ भागवण्यासाठी काही विशेष कौशल्ये शिकवणे या मुद्द्यांचादेखील समावेश होतो.
उपचाराचे टप्पे
*डीटॉक्सिफिकेशन* : व्यसनापासून मुक्त करताना रुग्णाच्या शरीरात भिनलेला व्यसनाच्या पदार्थाचा, द्रवाचा, रसायनाचा किंवा तत्सम गोष्टींचा अंश शरीरातून नाहीसा करणे, ही सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट असते. हा उपचार डॉक्टरांच्या नजरेखाली व्हावा लागतो. क्वचित प्रसंगी रुग्णाला इस्पितळात दाखल करण्याची गरज भासू शकते.
*औषधे* : व्यसनासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टीचा परिणाम कमी करणारी किंवा त्या गोष्टीचा दुष्परिणाम कमी करणारी औषधे रुग्णाला द्यावी लागतात. व्यसनाचे कारण जर चिंता, नैराश्य असेल तर त्यासाठी वेगळी औषधोपचार योजले जातात. मद्यप्राशनाची सवय जाण्यासाठी मद्याशी संपर्क आल्यावर ’रिॲक्शन’ येणारी औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिली जातात.
*समुपदेशन* : रुग्णाला व्यसन सोडण्याची गरज सांगणारे, व्यसन करण्याची मध्येच प्रबळ इच्छा झाल्यास ती कशी निपटावी यासाठी काही मार्गदर्शन करणारे, रुग्णाला चांगल्या व्यसनमुक्त आयुष्यासाठी प्रवृत्त करणारे संभाषण उपचार करणाऱ्यांना सतत करावे लागते.
रुग्णाच्या मनात व्यसनाची इच्छा होऊ नये आणि इच्छा झाल्यास तिचा सामना करण्यासाठी ’कॉग्निटिव्ह बिहेवीयर थेरपी’ हे विशेष मानसोपचार करावे लागतात. यामध्ये रुग्णाला त्याचे विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि त्यातून होणारे त्याचे वर्तन याचा ताळमेळ कसा राखावा आणि कसे वागावे, कसे निर्णय घ्यावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
ग्रुप थेरपी : यात व्यसने करणाऱ्या इतर व्यक्तींबरोबर एकत्र बसून संवाद केला जातो. याच बरोबर पूर्वी व्यसन केलेल्या पण त्यानंतर यशस्वीरीत्या त्यावर मात करून व्यसन सोडून दिलेल्या व्यक्तींबरोबर एकत्र संभाषण, चर्चा आणि मार्गदर्शन केले जाते.
*कौटुंबिक पाठबळ* : व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबीयांना व्यसनी व्यक्तीशी कसे वागावे, काय सांगावे याबाबत मार्गदर्शन केल्यास अनेक व्यसनी व्यक्तींची व्यसने सुटू शकतात.
उपचारामध्ये व्यसनी व्यक्तीला त्याच्या चरितार्थासाठी अर्थार्जनाची काही कौशल्ये शिकवणे आणि त्याला आपल्या पायांवर सन्मानाने उभा करणे हासुद्धा उपचारांचा एक भाग असतो.
पुरातन काळापासून आनंदाचा शोध हे माणसाच्या जीवनाचे ईप्सित असते हे ठरून गेले आहे. कलांच्या छंदांपासून भगवंताच्या उपासनेपर्यंत अनेकविध मार्ग शोधले जातात. पण आनंदप्राप्तीसाठी आणि दुःखांपासून दूर पळण्यासाठी व्यसनांचा मार्ग शोधणे म्हणजे आयुष्य मातीमोल करणे असते. हा आजार बरा करण्यासाठी लवकरात लवकर त्या व्यक्तीला ’व्यसनमुक्ती केंद्रात’ दाखल करणे गरजेचे असते. सुरवातीच्या काळात व्यसन थांबविताना जी काही शारीरिक किंवा मानसिक तडफड होते, त्यावरील योग्य तो औषधोपचार व्यसनमुक्तीकेंद्रातच शक्य असतात.
व्यसनांचे परिणाम
कोणत्याही प्रकारच्या व्यसनांचे शरीरावर दुष्परिणाम होतातच. हे परिणाम शारीरिक तर असतातच, पण मानसिकदेखील होतात.
*शारीरिक परिणाम* : दीर्घकाळ केल्या जाणाऱ्या व्यसनांनी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम तर होतातच, पण ते कायमस्वरूपी दुर्बळ आणि निकामी बनतात.
*हृदय* : तंबाखू, धूम्रपान आणि इतर नशील्या पदार्थांच्या सेवनाने उच्च रक्तदाब, छातीचे ठोके वाढणे, अनियमित पडणे,आणि हृदयविकाराचा झटका येणे असे गंभीर त्रास होतात.
*यकृत* : मद्यपान, हेरॉइन आणि इतर पदार्थांमुळे यकृतावर दुष्परिणाम होऊन ते निकामी होऊ लागते.
*मूत्रपिंडे* : व्यसनासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे मूत्रपिंडे निकामी होतात. त्यात व्यसनांनी वाढणाऱ्या रक्तदाबामुळेदेखील हा परिणाम होतो. अनेक व्यसनी रुग्णांना डायलिसिस करावे लागते.
*मेंदू* : मज्जासंस्थेच्या कार्यात अनेक रासायनिक द्रव्ये मेंदूमध्ये कार्यरत असतात. यात काही संदेशवहन करतात (ट्रान्समीटर्स) तर काही रासायनिक पदार्थ संवेदना ग्रहण करण्यासाठी (रिसेप्टर्स) वापरली जातात. या रासायनिक पदार्थांच्या कार्यात व्यसनांमुळे बिघाड होतो. परिणामतः वेदना आणि संवेदना ग्रहण करणे, भावनिक आनंद वाटणे या मेंदूच्या कार्यात बदल होऊन स्मृती, सजगता यावर परिणाम होतो आणि मानसिक स्वास्थ्य लयाला जाते.
*फुफ्फुसे* : धूम्रपान आणि इतर हुंगल्या जाणाऱ्या द्रव्यांमुळे कायमचा खोकला, फुफ्फुसाचा कर्करोग अशा विकारांची शक्यता जास्त असते.
*मद्यपानामुळे होणारे आजार* अतिरेकी मद्यपान हे शरीराला दीर्घकाळ ग्रासणाऱ्या (क्रॉनिक) असंख्य आजारांना निमंत्रण ठरते. या आजारात प्रमुख आजार म्हणजे-
*ॲनिमिया* : रक्तातील हिमोग्लोबिन वाजवीपेक्षा कमी होणे.
*कर्करोग* : घसा, यकृत, स्तन, अन्ननलिका, गुदाशय या अवयवांचे कर्करोग
हृदयविकार, अर्धांगवायू, स्मृतिभ्रंश, नैराश्य, उच्च रक्तदाब, गाऊट, अपस्माराचा अटके येणे, मज्जासंस्थेचे आजार असे आजार संभवतात.
*व्यसने आणि मानसिक आजार :* व्यसने म्हणजे मानसिक आरोग्याला लागलेले खग्रास ग्रहण असते. यामध्ये चिंता, नैराश्य, विस्मरण होणे, स्मृतिभ्रंश हे त्रास होतातच. पण आनंद आणि दुःखाचे हिंदोळे वेगाने बदलणारे ’मूड स्विन्ग्ज’ या व्यक्तीत प्रकर्षाने आढळून येतात. आक्रमकता आणि गुन्हेगारी वृत्ती वाढते, संशयी वृत्ती हा व्यसनांचा परिपाक असतो आणि मानसिक आरोग्याचा ऱ्हास होऊन निरोगी व्यक्तीचे मानसिक रुग्णात रुपांतर होते.
*आजच व्यसनमुक्तीचा संकल्प करा*